मी वाचल्याप्रमाणे देशातील प्रत्येक राज्यातील वास्तुशास्त्राच्या पुस्तकांमध्ये वास्तु ठीक नसेल तर घराच्या मालकाचा नक्की मृत्यू होणार असे लिहिले आहे. आणखी एका पुस्तकात घराच्या मध्यभागात घराचा मुख्य दरवाजा असू नये, असल्यास त्या कुटुंबाचा सर्वनाश होईल असे लिहिले आहे. माणसाला अगदी अंतिम भीती मृत्यूची असते. (वास्तुमुले मृत्यू ओढवेल म्हटले की ते भयभीत होतात यांचा विचार आहे). प्रत्येक गोष्टीला एक सीमा असते. तुझ्याने होत असेल तर दुसर्याचे भले कर …… नसेल जमत तर त्यांचे वाईट तरी चिंतू नकोस असे आपल्या पूर्वजांनी सांगितले आहे. पण घडते काय? ज्ञान नसलेल्या व्यक्तिला मृत्यूची भीती दाखवून आपल्या विचारांकडे खेचून घेणे अत्यंत चुकीचे आहे. माणसाचा जन्म आणि मृत्यू कोणाच्याही हातात नाही. ज्या वेळेला मृत्यू येईल त्यावेळी मरावेच लागते. एक क्षणही उशीर करणे शक्य नाही. मग वस्तूमुळे मृत्यू ओढवेल या म्हणण्यात काहीच तथ्य नाही. अश्या लिहिलेल्या गोष्टींनी त्रास करुन घेऊ नका हीच तुम्हाला माझी कळकळीचा विनंती आहे. कोणतेही घर कधीही आपल्या व कुटुंबाच्या मृत्यूला कारणीभूत ठरत नाही. मी आपल्या पहिल्या प्रश्नाला उत्तर दिल्यासारखेच सांगतो. वास्तु हे मृत्यु पर्यंत राहायचे ठिकाण आहे. परंतु मृत्यूचे कारण नाही. वास्तुशास्त्र म्हणजे आपण जगतो तितके दिवस वातावरण स्वच्छ करून त्याच्याशी समरस होऊन जगण्याची कला आहे. कृपया कोणीही कसलीही, भीती बाळगू नये.