माझ्या प्रत्येक व्याख्यानामध्ये मी हा प्रश्न श्रोत्यांना विचारतो तेव्हा प्रत्येकांकडून देव सगळीकडे आहे… तो सर्वव्यापी आहे. एखाद्याने नवे घर बांधल्यानंतर त्या घरात जाऊन देव कुठे आहे असा प्रश्न विचारला तर आता ईशान्य दिशेला असे उत्तर मिळते. काही वेळा पूर्वी देव सगळीकडे आहे म्हणालेलेच आता वेगळे बोलू लागतात. याचे कारण काय? प्रत्येक वास्तुशास्त्राच्या पुस्तकात ईशान्य दिशेलाच देवघर असायला हवे. नाहीतर तुमचे वाईट होईल असे लिहून भीती दाखवलेली असते. ही भीतीच लोकांना चुकीच्या मार्गाला खेचत असते. याला माझे उत्तर जरा लक्षपूर्वक वाचले तर तुम्हाला सत्य काय आहे हे समजेल. पुस्तक लिहिलेल्या पंडिताप्रमाणेच विचार करुया. आपल्या घरात ईशान्य दिशेला देव कोणी बसवला? आपणच ना? जेव्हा तुमच्या सांगण्याप्रमाणे किंवा तुम्ही बसवाल तेथे देव बसला म्हणजे कोणाचे सांगणे कोणी ऐकल्यासारखे झाले? तुमच्या सांगण्याने देव बसला तेव्हा देवाधिदेव कोण झाले? तुम्ही का देव? येथे तुम्हीच देवाधिदेव झालात. पुन्हा थोडा विचार करुन पाहा. देवाला हीच तुझी जागा आहे. तू इथेच बस असे सांगण्याची शक्ती तुमच्यात आहे का? देवाला तू इकडेच बस असे सांगणारे आपण कोण? आपण जेव्हा देव सगळीकडे आहे म्हणतो त्याचप्रमाणे घरात कोणत्याही जागेत देव ठेवता येतात.
आमच्या सरळ वास्तुमध्ये या बाबतीत असणारा एकमेव नियम म्हणजे देवघर कोठेही स्नानगृह किंवा शौचगृहाच्या वर किंवा खाली असू नये हा नियमँकशासाठी असे विचारलेत तर त्याचे कारण सांगता येईल. आपण पूजास्थान खूप स्वच्छ ठेवतो. शिवाय, फूले, अगरबत्ती आणि घंटानादाने त्या जागेत धनात्मक ऊर्जा उत्पन्न होत असते. त्याचप्रमाणे स्नानगृह व शौचगृंहात ऋणात्मक ऊर्जा उत्पन्न होत असते. या दोन्ही जवळ असल्या तर ऊर्जा मिळून ऋणात्मक ऊर्जा घरात पसरल्यामुळे घरात अशांत वातावरण तयार होते. तसेच मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मन:शांती देव देत नाही. तेथील घंटा, फुले, आरती याच आपल्याला मन:शांती देतात. त्यामुळेच देवघरात देवाचा फोटो न ठेवता बरीच फुले ठेऊन, अगरबत्ती लावणे, घंटा वाजवणे इत्यादी केल्यास तुमच्या घरात शांततेच्या वातावरणाचा अनुभव येईल. हे सोडून आपण देवांना ईशान्य दिशेला बसवले की झाले… आपल्याला मन:शांती मिळेल असे समजणे ही मूर्खपणाची गोष्ट होईल. आणखी काही वास्तुपंडित देवाचे तोंड विशिष्ट दिशेला करुन बसवले पाहिजे असे लिहितात. आपण वेदांमध्ये देवाचे वर्णन निर्गुण निराकार असे वाचलेले आहे. निराकार म्हणजे आकार नसलेला असा अर्थ होतो. आता तुम्हीच विचार करा. आकार नसलेल्या भगवंताचे तोंड कोणत्याही दिशेला करुन बसवले तरी काय फरक पडणार आहे? देवाचे तोंड विशिष्ट दिशेला असायला पाहिजे असे सांगणारे आपण कोण? आपल्यात इतके चैतन्य आले आहे का? याचा निर्णय तुम्हीच घ्या.
निरनिराळ्या संस्थांच्या पाहणीत काही देवापुढे दोन उदबत्त्या लावतात असे लक्षात आले आहे. काही जण एकच उदबत्ती लावतात, तर काही जण एक उदबत्ती लावून ती विझवून, दुसर्या दिवशी परत तीच उदबत्ती लावणारेही आहेत. आपण जेव्हा उदबत्तीच्या खर्चाचा विचार करतो तेव्हा आपल्याला मिळणाऱ्या धनात्मक ऊर्जाचे प्रमाणही कमी होते. वास्तविक आपण जे करायला हवे ते सोडून जे नको ते करायला निघालो आहोत. या पुढे तरी घरातील कोणत्याही जागेत देव ठेवता येईल हे तुमच्या लक्षात आले आहे असे मी समजतो.